भुसावळ : प्रतिनिधी
येथील समता नगरात मयत नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांचा पुत्र आतीष खरात याच्यासह तिघांनी आशीष आलोटकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना रात्रभर बंधक बनवून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत शहर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे तर एक अद्याप फरार असल्याचे समजते.
सविस्तर वृत्त असे की, समता नगरातील रहिवासी आशिष स्टीफन आलोटकर यांच्या घरात शिरत कुटुंबियांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत श्री. आलोटकर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांच्या घराजवळ माजी नगरसेवक स्व. रवींद्र उर्फ हंप्या खरात यांचे घर आहे. २०१९ मध्ये खरात यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी ते आलोटकर यांच्या घरातील बाथरूममध्ये शिरले होते. मात्र हल्लेखेारांनी तेथेही त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी आलोटकर कुटुंबातील कोणीही घरी नव्हते. मात्र, या घटनेनंतर मयत रवींद्र खरात यांचा मुलगा आतिष खरात नेहमी आलोटकर कुटुंबाला शिवीगाळ करत धमकावत होता. तो आपल्या वडिलांच्या मृत्यूसाठी या कुटुंबाला दोष देत होता.
यानंतर गुरूवारी मध्यरात्री आतिष खरात, पप्या साळवे, आकाश खिल्लारे यांनी घरात शिरून कुटुंबियांना मारहाण केली. विशेष बाब म्हणजे या टोळक्याने आलोटकर कुटुंबियांना पहाटे पाचपर्यत बंदीस्त करून ठेवले होते.तर यातील प्रमुख संशयित आतीष खरात याचा शोध सुरू असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पप्या साळवे, आकाश खिल्लारे व सुमीत घनघाव यांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघांना न्यायालयाने २५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.