जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२४
किनगाव ते यावल रस्त्यावर दुचाकीव्दारे मागून येत लाथ मारून दुचाकी चालकास अडवून १० हजाराची रोकड व मोबाईल २ अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना १६ नोव्हेंबरला रात्री घडली होती. यात दोन संशयितांना पोलिसांनी अटक करुन शनिवारी दोघांना यावल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील भालशिव पिंप्री येथील सरपंच मोहन एकनाथ सपकाळे व शिवलाल भगवान सपकाळे हे चोपडा येथून १६ नोंव्हेंबर रोजी रात्री यावलकडे येत होते. दरम्यान, किनगावजवळ त्यांच्या दुचाकी (एमएच १९, बीएल- ००५१) ला मागून येणाऱ्या दुचाकी (एमएच- २८, एडब्ल्यू- २३८) वरील व्यक्तीने लाथ मारली. तसेच त्यांना थांबवून हत्याराचा धाक दाखवून पैशांची मागणी करत ठार मारण्याची धमकी दिली होती. धमकी देऊन त्यांनी मोबाईल व १० हजारांची रोकड लांबवून नेली होती. या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, परमेश्वर जाधाव यांनी त्या दुचाकी क्रमांकावरून मुळ मालकाचा शोध घेतला.
तसेच सीसीटीव्ही फुटेज ही तपासले. त्यानंतर या गुन्ह्यातील संशयित फरहान शेख फारूख अहेमद (वय २४, रा. मिर्झानगर, इक्बाल चौक, बुलढाणा) व शेख राजिक शेख इसरार (वय २२, रा. डांगपुरा, यावल) या दोघांना अटक केली होती. या दोघांची ओळख परेड पार पडल्यानंतर दोघांना जिल्हा कारागृहातून ताब्यात घेत शनिवारी यावल येथील न्यायालयातील न्यायधीश आर. एस. जगताप यांच्यासमोर हजर केले. त्यांनी या दोघांना २ डिसेंबरपर्यंत अर्थात ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांना जिल्हा कारागृहात हलवण्यात आले आहे. तपास पोलिस उपनिरिक्षक सोपान गोरे, हवालदार परमेश्वर जाधव करत आहेत.