
जळगाव मिरर | १० एप्रिल २०२६
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासू आणि सासऱ्यांविरुद्ध बालविवाह आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचा विवाह साधारण एक वर्षापूर्वी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे जळगाव तालुक्यातील एका तरुणासोबत झाला होता. लग्नानंतर पीडिता पती व सासू-सासऱ्यांसोबत राहत होती. यादरम्यान ती गरोदर राहिली. दि. ३ एप्रिल रोजी प्रसूती कळा सुरू झाल्याने तिला रात्री ८ वाजेच्या सुमारास जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे तिने एका कन्येला जन्म दिला. रुग्णालयातील उपचारानंतर पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला. पीडितेचा जन्म ३ एप्रिल २०१२ चा असून, प्रसूती झाली त्या दिवशी तिचे वय अवघे १४ वर्षे ५ दिवस इतके होते.
अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणे आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा गंभीर गुन्हा असल्याने पोलिसांनी तत्काळ पावले उचलली. सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे आणि पोलीस उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे यांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४ (२), ६५ (१) सह पोक्सो व बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत पतीसह सासू व सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पीडित माता आणि बाळ सुखरूप असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





















