जळगाव मिरर | 26 जून 2024
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नवतेजस्विनी प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील ओझर शिवारात रेडिमेड गारमेंट युनिट सुरू करण्यात आले आहेत. यात तालुक्यातील ३० महिलांना स्वयंरोजगार मिळाला असून त्याचे नुकतेच शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माविम जळगाव चे उपजीविका तज्ञ प्रशांत पाटील, व्यवस्थापक आशिष मोरे, चाळीसगाव कोओर्डीनेटर राजश्री राजपूत, कर्मचारी पंकजा बागुल, रंजना अहिरे आदी उपस्थित होते.
सदर प्रकल्पासाठी शासनाकडून सबसिडी उपलब्ध होती मात्र जागा नसल्याने गेली अनेक वर्षे हा प्रकल्प सुरू होत नव्हता. ही बाब आम्ही आमदार मंगेशदादा चव्हाण यांना सांगितली असता त्यांनी आपली ओझर येथील लावण्या सिटी मधील खाजगी जागा निशुल्क उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज हा प्रकल्प सुरू होऊ शकला असल्याची भावना अभियानाच्या कोओर्डीनेटर राजश्री राजपूत यांनी व्यक्त केली.
सदर रेडिमेड गारमेंट युनिट मध्ये 31 मशीन असून 30 महिला यावर शिलाई करतील, त्यांच्यावर 3 ट्रेनर लक्ष ठेवून असणार आहेत. सद्यस्थितीत शाळेचे गणवेश शिलाई काम सुरू असून प्रति नग प्रमाणे महिलाना मजुरी दिली जात आहे.
