जळगाव मिरर । २७ ऑक्टोबर २०२५
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरु असून यावर महसूल व पोलीस प्रशासनामार्फेत कारवाई होणे क्रमप्राप्त असताना यावर आता थेट नागरिकांनी वाहन पकडून तहसीलदारांना दिल्याची घटना घडली आहे. अमळनेर तालुक्यातील पांझरा, तापी व बोरी नदीतून राजरोसपणे वाळूचोरी सुरू असताना महसूल प्रशासन कोमात गेल्याने आता पांझरा काठावरील ग्रामस्थांनीच एल्गार करत दोन ट्रॅक्टर पकडून तहसीलदारांना सुपूर्द केले.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यात सर्रास वाळूची संघटितपणे लूट सुरू असताना तालुका प्रशासनाकडून तालुक्यात वाळू बंद असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना देण्यात येते. बाम्हणे, कळंबु, मुडी प्र.डा व बोदडें ग्रामस्थ यांच्या संयुक्त कारवाईत दि. २६ रोजी दुपारी दोन वाळू ट्रॅक्टर पकडले. त्यापैकी एक ट्रॅक्टर मुडी गावात, तर दुसरा कळंबू रेल्वे पुलाखाली पकडण्यात आला. ग्रामस्थांना पाहून वाळू भरायला आलेले इतर दोन खाली ट्रॅक्टर पळून गेले. त्यानंतर पकडलेले दोन्ही ट्रॅक्टर मुडी गावात एकत्र करून कायदेशीर प्रक्रियेनुसार अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मारवड पोलीस पथकास बोलावण्यात आले होते. त्यानंतर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मंडळ अधिकारी धनराळे, तलाठी सुधीर पाटील यांनी मुडी येथे येऊन ग्रामस्थांनी पकडून दिलेले ट्रॅक्टर नेऊन तहसील कार्यालयात जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
या संपूर्ण कारवाईत बाम्हणे, कळंबु, मुडी प्र.डा व बोदडें ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत पदाधिकारी, बाम्हणे पोलिस पाटील गणेश भामरे, बोदडें पोलिस पाटील चौधरी, मुडी प्र.डा येथील पोलिस पाटील केशव पाटील यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.



















