जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२४
एरंडोल शहरातील नारायण नगर मध्ये लोखंडी जिन्याला दोर बांधून ४२ वर्षीय इसमाने रविवारी पहाटे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. समाधान नारायण पाटील असे मयताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समाधान पाटील हा कालीपिली गाडी चालवून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होता. चार वर्षांपूर्वी समाधान पाटील हा अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यात त्याला इन्फेक्शन झाल्याने औषधोपचार करण्यासाठी त्याची पत्नी त्यांना मुंबई येथे घेऊन गेली होती. तेथे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचे सांगण्यात आले होते. मुंबई येथून ते दोघेजण खाजगी वाहनाने एरंडोल येथे रविवारी भल्या पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घरी पोहोचले.
दीड तासानंतर समाधान नारायण पाटील याने त्यांच्या घराच्या समोर गॅलरीला असलेल्या लोखंडी जिन्याला दोर बांधून गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी राहुल रमेश पाटील यांनी दिलेल्या खबरवरून एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास एरंडोल पोलीस करीत आहेत.