जळगाव मिरर | २२ जानेवारी २०२४
देशातील प्रत्येक रामभक्तांची गेल्या पाच शतकांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता आला आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठान कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अवघ्या काही तासात मागील ५०० वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. संपूर्ण रामभक्तीत तल्लीन झाली असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक क्रिकेटपटू, सेलिब्रिटी, उद्योगपती, संत आणि विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने अयोध्येतील श्री रामजन्मभूमी येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सकाळी 10 वाजल्यापासून मंगल ध्वनी वादनाचा कार्यक्रम होणार आहे. विविध राज्यातील 50 हून अधिक वाद्ये सुमारे दोन तास या शुभ सोहळ्याचे साक्षीदार असतील.
आज 22 जानेवारी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी सुरू होईल. प्राणप्रतिष्ठेची मुख्य पूजा अभिजीत मुहूर्तावर होईल. काशीचे विद्वान गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ निश्चित केली आहे. प्राणप्रतिष्ठाण पौष महिन्याच्या द्वादशी तारखेला 22 जानेवारी 2024 अभिजीत मुहूर्त, इंद्र योग, मृगाशिरा नक्षत्र, मेष लग्न आणि वृश्चिक नवमशामध्ये होईल.
शुभ मुहूर्त सकाळी 12 वाजून 29 मिनिट 8 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिट आणि 32 सेकंद असेल. म्हणजे प्राणप्रतिष्ठेची शुभ मुहूर्त फक्त 84 सेकंद आहे. श्री रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
काशीचे प्रसिद्ध वैदिक आचार्य गणेश्वर द्रविड आणि आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली 121 वैदिक आचार्यांकडून हा विधी पार पडणार आहे. या काळात 150 हून अधिक परंपरा आणि 50 हून अधिक आदिवासी, गिरिवासी, तटवासी, द्वीपवासी परंपरांचे संत आणि धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत.