
जळगाव मिरर | २४ एप्रिल २०२५
पालघरच्या विरार येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. तब्बल 21 व्या मजल्यावरून 7 महिन्याचे बाळ खाली पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी 23 एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास विरार पश्चमी येथील जॉय विला कॉम्प्लेक्समधील पिनॅकल सोसायटीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिनॅकल सोसायटीच्या 21 व्या मजल्यावर विकी सेदानी आणि पूजा सेदानी हे दाम्पत्य राहत होते. त्यांचा 7 महिन्यांचा मुलगा व्रिशांक उर्फ वेदला झोप येत नव्हती, म्हणून पूजा यांनी त्याला कुशीत घेत बेडरूममध्ये फिरत होत्या. जरा हवा यावी म्हणून त्यांनी बाल्कनीची स्लायडिंग खिडकी उघडी ठेवली. तिथली फरशी ओलसर असल्याने पूजा यांचा पाय घसरला आणि त्या बाल्कनीच्या दिशेने पडल्या, यात त्यांचे कुशीत असलेले बाळ बाल्कनीमधून थेट खाली पडले. यानंतर तातडीने बाळाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
विकी सेदानी आणि पूजा सेदानी यांना 7 वर्षांनी मूल झाले होते. या अपघाताने दोघांच्याही मनावर खोल जखम केली आहे. दरम्यान, आजकाल मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये उंचच उंच इमारती उभारल्या जात आहेत. तसेच अनेक ठिकाणी बाल्कनीच्या बाहेरच्या बाजूने जाळी बसवलेली असते, परंतु, काही इमारतींना बसवलेली नसते. अशा वेळेस घरातील लहान मुलांची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. इमारतीवरून पडून अनेकांचे अपघात झाल्याच्या घटना घडत असतात. खबरदारी म्हणून बाल्कनी किंवा खिडक्यांना जळी बसवणे अनिवार्य आहे. सेदानी दांपत्याच्या आयुष्यातील ही सर्वात दुःखद घटना घडली आहे. हातात असलेले आपले बाळ असे अचानक पडून क्षणात नाहीसे होणे, ही जखम आयुष्यभर मनातून जाणार नाही. या घटनेमुळे सेदानी कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.