जळगाव मिरर । २६ नोव्हेबर २०२२
माझ्या शेतातील तुरीची नुकसानभरपाई द्या म्हटल्याचा राग येऊन तिघांनी पिता-पुत्रास लोखंडी पाइप आणि दगडाने डोक्यावर मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास धानवड गावात घडली. या मारहाणीत पिता-पुत्र जखमी झाले आहेत. लक्ष्मण पाटील व संदीप लक्ष्मण पाटील (२९) अशी जखमी पिता-पुत्रांची नावे आहेत.
धानवड येथील संदीप पाटील हे गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता घराकडे येत होते. त्यावेळी रवींद्र नामदेव पाटील, गजानन रवींद्र पाटील नामदेव गोविंदा पाटील (सर्व रा. धानवड) यांनी रस्त्यात संदीप पाटील यांची दुचाकी अडविली. त्यांनी ‘तू आमची गाय सोडून दे’ असे म्हटल्यावर संदीप यांनी ‘माझ्या शेतातील तुरीची नुकसान भरपाई द्या’, असे त्यांना सांगितले.
याचा राग येऊन रवींद्र पाटील याने त्यांच्या डोक्यावर लोखंडी पाइने तर गजानन पाटील व नामदेव पाटील यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेले संदीप यांचे वडील लक्ष्मण पाटील यांनासुद्धा शिवीगाळ करण्यात आली. नंतर गजानन पाटील याने दगड उचलून तो लक्ष्मण पाटील यांच्या डोक्यात मारला. या घटनेमध्ये पिता-पुत्र जखमी झाले. त्यानंतर संदीप पाटील यांनी रात्रीच एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.