मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील करोनाचे सर्व निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मास्क लावणे हिताचे आहे. मात्र त्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे, असे राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
राज्यात करोनाचे निर्बंध हटवले जाण्याचे संकेत गेल्या काही दिवसापासून मिळत होते. राज्यात अद्याप जमावबंदीचे आदेश लागू होते. त्यामुळे गुढी पाडवा आणि रामनवमीच्या उत्सवाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळे हे निर्बंद रद्द करण्याच्या निर्णयामुळे हे उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्यात येणार आहेत.
यापुढे मास्क घालणे हे देखील बंधनकारक नसेल, असे आव्हाड यांनी एका वृत्त वाहिनीला सांगितले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळाने उद्यापासून अर्थात 1 एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना वाटत असेल मास्क लावावा, त्यांनी तो लावावा.
येत्या 1 एप्रिल ते 8 एप्रिलपर्यंत राज्य सरकारने जमावबंदी लागू केली होती. विरोधकांनी यासंदर्भात राज्य सरकारवर सातत्याने टीका केली होती. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी बोलताना गुढीपाडव्यासाठी निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते. शोभायात्रांना काही ठिकाणी परवानगी मिळाली असून मुंबईसह अन्य भागातील पोलीस राज्य सरकारच्या करोना निर्बंध शिथिलीकरणाच्या सूचनांची वाट पाहात आहेत.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना गुढीपाडव्यासाठी निर्बंध शिथिल केले जातील, असे नमूद करून टोपे म्हणाले, करोना रुग्णसंख्या घटल्याने मास्कसक्ती रद्द करण्याची मागणी अनेक संस्था, संघटना व नागरिकांनी केली आहे. मात्र त्याबाबत वैद्यकीय कृतीगटाची चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रा व मिरवणुकांच्या परवानगीबाबत आणि निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे योग्य निर्णय घेतील, असे राजेश टोपे म्हणाले होते. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण करोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसत आहे. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये करोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत.
आता मास्क ऐच्छिक
आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये करोना काळात लावण्यात आलेले राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आता मास्कही बंधनकारक नाही, पण ऐच्छिक आहे. याचा अर्थ आता मास्क वापरणं बंधनकारक नाही. मास्क ऐच्छिक आहे. म्हणजे मास्क वापरायचा की नाही हे तुमच्या हातात आहे. मास्क वापरण्यासाठी तुमच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
काय-काय बदलणार?
– मार्च 2020 ते 31 मार्च 2022 जवळपास दोन वर्षे लागू असलेले करोनाचे निर्बंध संपुष्टात येतील.
– गुढी पाडव्यानिमित्त शोभायात्रा काढता येणार
– रमजान आणि आंबेडकर जयंतीही उत्साहाने साजरा करता येणार
– केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोसल डिस्टन्सिंग कायम असेल.
– हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा हटणार.
– लग्न किंवा कौटुंबिक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा लागू असणार नाही.