जळगाव मिरर / २ डिसेंबर २०२२
“गेल्या ८ वर्षाच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या काळात शेतकरी, शेतमजूर,छोटे व्यावसायिक, महिला, विद्यार्थी, युवक व सर्वसामान्य जनतेच्या समस्या तीव्र होत चाललेल्या आहेत म्हणूनच जनसामान्यांच्या प्रश्नांवर कम्युनिस्ट पक्षाच्या सभासदांनी संघर्ष तीव्र करावा असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नवनिर्वाचित राज्य सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष लांडे (अहमदनगर) यांनी येथे केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या बळीराम पेठ येथील कार्यालयात झालेल्या भाकपच्या जळगाव जिल्हा कौन्सिलच्या विस्तारित बैठकीत ते बोलत होते. जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जळगाव जिल्हा सचिव कॉ.ज्ञानेश्वर पाटील यांनी आजच्या बैठकीचे प्रास्ताविक केले. तर कॉम्रेड राजेंद्र यांनी स्वागत केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य सचिव कॉ.तुकाराम भस्मे (अमरावती) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव तथा महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे राज्य उपाध्यक्ष की.प्रा.राम बाहेती (औरंगाबाद) यांनी २०२३ ची सभासद नोंदणी, जनसंघटनांची बांधणी, २६ डिसेंबर रोजीचा नागपूर येथे होणारा मोर्चा ,जाती धर्माच्या नावाखाली सध्याचे सरकार करीत असलेले राजकारण,२०२४ मध्ये या सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वधर्मनिरपेक्ष पक्ष संघटनांची व्यापक एकजूट इ.बद्दल मार्गदर्शन केले. गायरान जमीनीच्या प्रश्नासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या ६ आक्टोबर रोजी दिलेल्या निकालामुळे महाराष्ट्रातील सव्वादोन लाख गायरानधारक बेघर व भूमीहीन होणार असल्यामुळे या वंचित समूहासाठी पक्ष सभासदांनी व लाल बावटा शेतमजुर युनियनच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष करावा असे आवाहन कॉ.बाहेती यांनी केले.
३१ डिसेंबरच्या आत विस्तारित बैठक घेण्याचा निर्णय
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जळगाव जिल्हा कौन्सिलची विस्तारीत बैठक ३१ डिसेंबरच्या आत जिल्हा सचिव कॉ.ज्ञानेश्वर पाटील यांनी बोलवावी व त्यात जिल्हा कार्यकारिणीची निवड करावी असा निर्णय आजच्या बैठकीत झाला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य सचिव कॉ.तुकाराम भस्मे (अमरावती) यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विजयवाडा येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनातीलनिर्णयाची माहिती दिली.
या बैठकीस पक्षाचे राज्य कोषाध्यक्ष कॉ.अशोक सूर्यवंशी, कॉ.ज्ञानेश्वर पाटील, कॉ.राजेंद्र झा,कॉ. विठ्ठल बडगुजर, कॉ.मंदाकिनी मोरे, कॉ.कोळी, कॉ.देविदास बोंदार्डे ,तेजोमयी भालेराव,आदींची यावेळी उपस्थिती होती.तर भाकप जिल्हा सचिव कॉ. ज्ञानेश्वर पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.