
जळगाव मिरर / ६ डिसेंबर २०२२
चोपडा तालुक्यातील बिडगाव येथील भूमिपुत्र व इंडो- तिबेट बार्डर फोर्समध्ये सेवारत असलेले जवान अशोक हिरामण पाटील यांना गुवाहाटी येथे वीरमरण आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना आसामच्या सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान दि. ६ रोजी मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. जवान अशोक पाटील यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर दि ८ रोजी गुरुवारी चोपडा तालुक्यातील त्यांच्या बिडगाव या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बिडगाव येथील अशोक हिरामण पाटील (३५) हे अरुणाचल प्रदेश येथील युपिया येथे इंडियन तिबेट बार्डर फोर्स ३१ बटालियन येथे सेवेत होते. त्यांना पाच दिवसांपूर्वी डोक्यात त्रास होऊ लागल्याने व तब्येत खालावल्याने आसाम येथील गुवाहाटीच्या सैनिक रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना दि. ६ रोजी मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव गुवाटीहून विशेष विमानाने हावडा व तेथून इंदूर व वाहनाने बिडगाव येथे आणले जाणार आहे. गुरुवारी दि ८ रोजी दुपारपर्यंत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते. हिरामण झावरू पाटील यांचा अशोक हा एकुलता मुलगा होता. अशोक पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, तीन बहिणी असा परिवार आहे.




















