जळगाव मिरर | १५ ऑक्टोबर २०२६
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील एम. एफ. तराळ विद्यालयात १७ शिक्षक व कर्मचाऱ्यांची बनावट ‘शालार्थ’ भरती झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत दाखल गुन्ह्यातील संशयित असलेले विद्यालयाचे सचिव विनोद रामदास तराळ यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. एका शिक्षकाला नोकरी देण्याच्या मोबदल्यात तराळ यांनी २५ लाख रुपये घेतले असून, त्यासाठी संबंधित शिक्षकाने स्वतःची वडिलोपार्जित शेतजमीन विकल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे.

नाशिकरोड पोलिसांत सन २०२५ मध्ये दाखल गुन्ह्यात संशयित विनोद तराळ यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, कागदपत्रे आणि तपासाच्या अहवालानुसार, शिक्षणाधिकाऱ्यांचा अहवाल व पुराव्यांवरून नियुक्त्यांच्या मंजुरीची कागदपत्रे संबंधित कार्यालयात उपलब्ध नाहीत तसेच बनावट कागदपत्रे तयार केल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.
जानेवारी २०१९ ते मे २०२२ या काळातले मुख्याध्यापक राजेश शांताराम पाटील यांनी जबाबात स्पष्ट केले की, त्यांच्या कार्यकाळात संबंधित १७ कर्मचारी शाळेत काम करत नव्हते. त्यामुळे विनोद तराळने संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती सन २०१४ ते २०१७ दरम्यान जाहिरात देऊन केल्याचे खोटे ठरले. यासह जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या पत्रानुसार, संबंधित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीशी संबंधित मूळ दस्तऐवज शिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गत दोन आठवड्यांत माजी शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण, शिक्षण संस्थेचा तत्कालीन अध्यक्ष शरद शिंदे व आता सचिव विनोद तराळ यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे तिघांवरही अटकेची टांगती तलवार आहे.




















