
जळगाव मिरर । ९ डिसेंबर २०२२
माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे यांना आता दूध संघात आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने, त्यांच्याकडून केवळ मतदानाआधी सनसनाटी निर्माण करण्यासाठीच चुकीचे आरोप केले जात आहे, एकनाथराव खडसे यांचा खेळ ‘खल्लास’ होणार असून, आता त्यांनी डब्याची व्यवस्था करावी, कारण त्यांना लवकरच जेलमध्ये जावेच लागेल, अशा शब्दात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार एकनाथराव खडसेंना इशारा दिला आहे.
बुधवारी एकनाथ खडसे यांनी दूध संघातील बी ग्रेड तुपाच्या विक्रीचा अपहार हा मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या प्रशासक मंडळाच्या कार्यकाळात झाल्याचा आरोप करत, प्रशासक मंडळावर गुन्हा दाखल करण्याबाबत न्यायालयात दावा दाखल केल्याचे सांगितले होते. त्यांच्या या आरोपांना उत्तर देण्यासाठी गुरुवारी अजिंठा विश्रामगृहात मंगेश चव्हाण यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना थेट जेलमध्ये जावे लागणार असल्याचा इशाराच दिला. अनेक प्रकारचे गंभीर आरोपदेखील चव्हाण यांनी खडसेंवर केले.




















