
जळगाव मिरर । ९ डिसेंबर २०२२
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आज दि 9 रोजी दुपारच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मोठी कारवाई करत एका कर्मचाऱ्यास लाच स्वीकारतांना रंगेहात पकडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेली माहिती अशी कि, जिल्ह्यातील अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सापळा रचून लिपीक शशिकांत नारायण साळवे रा. रा.मंगलमुर्ती नगर, पिंप्राळा, साईबाबा मंदीरा जवळ,जळगाव यांना दहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली. अवैध सावकारीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ न देता अपीलात मदत करण्यासाठी दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने संबंधीत तक्रारदाराने याबाबतल लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यात शशिकांत नारायण साळवे या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.




















