
जळगाव मिरर । १२ डिसेंबर २०२२
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे आपल्या धडाकेबाज भाषणासाठी व आवाजासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी मंचावर उभं राहावं आणि हजारो-लाखोंची सभा गाजवावी, हे गेली कित्येक वर्षांचं जुळलेलं समीकरण. आक्रमकपणा ही त्यांची ओळख पण हेच गुलाबराव पाटील जेव्हा रंगात येतात, तेव्हा त्यांच्या तोंडून कव्वाली निघते. दि ११ रोजी जिल्हा दुध संघातील निवडणुकीचा निकाल त्यांच्या पारड्यात पडला होता तर सायंकाळी जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कव्वाली म्हणूत सर्वांचं लक्ष वेधल्याचं दिसून आलं आहे.
गुलाबराव पाटील यांना तोंडपाठ कव्वाली म्हणताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याचे दिसून आले. तर याचवेळी उपस्थितांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दाद दिल्याचंही पाहायला मिळालं आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार गुलाबराव पाटील यांनी चढता सुरज धीरे धीरे ही अजरामर कव्वाली गायली. यामुळे उपस्थित सर्वच गुलाबरावांच्या कव्वालीला दाद देत होते.पाटलांनी एवढ्या सुरात कव्वाली गायली की सगळे मंत्रमुग्ध झाले.
दरम्यान कव्वाली गातानाचा गुलाबराव पाटलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गुलाबराव पाटील हे कार्यकर्त्यांच्या घोळक्यामध्ये बसून कव्वाली गाताना दिसत आहेत. कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणारे गुलाबराव पाटील हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आहेत. आक्रमकपणा आणि धडाकेबाज वक्तव्य यांच्यामुळे गुलाबराव पाटील नेहमीच चर्चेत असतात. बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेल्या गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे. एक साधा पानटपरी चालक ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.



















