
जळगाव मिरर । १३ डिसेंबर २०२२
चोपडा तालुक्यातील धानोरा येथे शॉक लागून झिरो वायरमनच्या मृत्यू झाला होता. यानंतर संतप्त जमावाने वीज आहे. वितरणच्या दोन अभियंत्याना मारहाण केली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत मयाराम कोळी, नवल विजय पाटील, प्रमोद नेमिचंद पाटील, सचिन प्रदीप पाटील, भावसिंग पावरा अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांची नावे आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. बिडगांव येथील झिरो वायरमन दत्तू आत्माराम पाटील यांचा रविवारी सकाळी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. यानंतर वीज अधिकारी उशिराने पोहचले.यामुळे संतप्त जमावाने विज वितरणचे कनिष्ठ अभियंता डी.डी. घरजारे व चोपडा विभागीय अभियंता एन. एस. रासकर यांना मारहाण केली होती. आपला जीव वाचवित ते कसेतरी वाहनापर्यंत पोहचले. यावेळी पोलीस व नागरिकांनी आवरा आवर केल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत अडावद पोलिस स्टेशनला घरजारे (२७) यांनी फिर्याद दिली. त्यावरुन वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.




















