जळगाव मिरर / १४ फेब्रुवारी २०२३ ।
जळगावात आतेभावाच्या लग्नानिमित्ताने धरणगावातून येत असलेल्या विवाहितेचा पाळधीजवळ महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. कविता प्रशांत चौधरी असे विवाहितेचा नाव आहे. तर दुचाकीस्वार विलास देवीदास चौधरी हे गंभीर जखमी आहेत.
धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील रहिवासी कविता चौधरी यांची आत्या जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरात राहतात. आत्याच्या मुलाचे लग्न असल्याने हळदीसाठी त्या सोमवारी शेजारी राहत असलेले विलास देवीदास चौधरी यांच्यासोबत दुचाकीवरुन येत होत्या. परंतु, पाळधीच्या पुढे आल्यावर मागून भरधाव वेगाने मागून येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली.
डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार विलास चौधरी आणि कविता हे रस्त्यावर फेकले गेले. दोन्ही पायावरुन डंपरचे चाक गेल्याने कविता चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर विलास चौधरी यांच्या डोक्याला, पाय आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून चालक फरार झाला आहे.
