जळगाव मिरर / २९ मार्च २०२३ ।
जळगाव शहरातून नातेवाईक महिलेसोबत बाहेर गावी जाताना ५४ वर्षीय महिलेची बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील २८ ग्रॅम वजनाची दीड लाखांची सोन्याची पोत लांबविल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील संभाजी नगर परिसरात कल्पना अशोक महाजन (वय-54) महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवार दि. 27 मार्च रोजी दुपारी एक वाजता त्यांचे नातेवाईक कलावती सुरेश महाजन रा. रामानंदनगर यांच्यासोबत रिंगणगाव येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी जळगाव शहरातील नवीन बसस्थानक येथे आल्या. रिंगणगाव येथे जाण्यासाठी त्या रवंजा बसमध्ये बसल्या.
यावेळी बसमध्ये मोठी गर्दी होती. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जवळून बस जात असताना महिलेच्या गळ्यातील दीड लाख रूपये किंमतीची 28 ग्रॅम सोन्याची पोत त्यांच्या गळ्यात दिसून आली नाही. त्यांनी त्यांची बॅग चेक केली असता त्यांना काही माहिती मिळाली नाही. बस थेट पाळधी पोलीस दूरक्षेत्र येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी पोलिसांनी प्रत्येक प्रवाशाची विचारपूस करून तपासणी केली. परंतु सोन्याची पोत मिळून आली नाही. अखेर महिलेने मंगळवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
