जळगाव मिरर / १४ एप्रिल २०२३ ।
राज्यात काल पहिल्यांदाच तापमानाचा पारा 42 अंशावर होता. एकीकडे वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे तापमानातही मोठी वाढ होताना दिसून येत आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसासह, गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे.
नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर पूर्व विदर्भापासून, मराठवाडा, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, खंडीत वारे वाहत आहेत. या परिस्थितीमुळे आज राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात पुढील चार, दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात 13 ते 17 एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, धुळे, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांना अलर्ट जारी असून गारांसह पावसाची शक्यता आहे. अवकाळीसोबतच वाढत्या उन्हाच्या तडाख्यातही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात उष्माघाताने दोन बळी गेले आहेत. जळगाव आणि हिंगोली दोन बळी गेले असताना वाढत्या तापमानामुळे चिंता वाढली आहे. अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा, त्यासाठी छत्री किंवा स्कार्फ वापरा ज्यामुळे त्रास कमी होऊ शकतो असे आवाहन करण्यात येत आहे.




















