
जळगाव मिरर / २२ एप्रिल २०२३ ।
ठाकरे गटाची जिल्ह्यातील पाचोऱ्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होवू घातली असतांना एक दिवसा आधी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत जळगावात दाखल झाले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत चौफेर टीका केली आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवारांना देखील मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्याने पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापले आहे.
पत्रकार परिषद घेवून राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. यावेळी अजित पवारांनी शुक्रवारी केलेल्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी नाव नघेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री पदाची क्षमता आहे, ते अनेक वर्ष राजकारणामध्ये आहेत, अनेक वर्ष मंत्री आहेत, तसेच चार वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे अनेकांना वाटत असतं मुख्यमंत्री व्हावं” एकनाथ शिंदे यांचं नाव नघेता म्हणाले की, अनेक जण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, तोड फोड करून. जर एखाद्याच्या भाग्यात योग असेल तर होत असत, अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची अनेक वेळा इच्छा बोलून दाखवली. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. अशी प्रतिक्रिया अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेवर संजय राऊतांनी दिली.






















