जळगाव मिरर | ८ मे २०२३
रावेर तालुक्यातील रसलपूर येथील एका घरासमोरील गटारीत दि ७ रोजी रविवारी अर्भक सापडले असून हे अर्भक मुलगा आहे. याप्रकरणी रावेर पोलिसांत अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे बाळ जन्मत:च नाळेसहच गटारात फेकून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील रसलपूर येथील एका रस्त्यावर विलास महाजन यांच्या घरासमोरील गटारातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे महाजन यांनी फरशी उचलून पाहिली तर पुरुष जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले. यासंबंधी त्यांनी रसलपूर येथील पोलिस पाटील प्रमोद यशवंत धनके यांना माहिती दिली. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी पंचनामा करून मृत अर्भक रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविले. हे तीन चार दिवसांपूर्वी अपूर्ण कालावधीत जन्मलेले पुरुष जातीचे अर्भक नाळेसह गटारीत फेकून दिले असल्याची माहिती समोर आली. अर्भकाच्या डीएनए चाचणीसाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.