
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेरसह पारोळा आणि भडगावात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. तसेच पाचोरा तालुक्यातील काही भागातही पावसाने हजेरी लावली. गेले अनेक दिवस प्रतीक्षा लागून राहिलेल्या पावसाने तिन्ही तालुक्यांतील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा दिला.
भडगाव शहर परिसरात मंगळवारी पाऊस झाला. तुरळक सरी बरसल्या तरी उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे गारवा मिळाला. कजगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला. पाचोरा तालुक्यातील वरखेडी भागातही मंगळवारी पाऊस झाला हवामानाचा अंदाज घेता बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली होती. मंगळवारी पाऊस सुरू होताच शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला.





















