
जळगाव मिरर | २९ जून २०२३
जळगाव शहरात नुकताच ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रम झाला या कार्यक्रमात गर्दी व्हावी, यादृष्टीने स्वस्त धान्य दुकानाच्या लाभार्थ्यांना ”दम’ भरणारे संदेश सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला होता. त्याची दखल घेत पुरवठा विभागाने नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांचा स्वस्त धान्य दुकान परवाना निलंबित केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दारकुंडे यांनी ‘शासन आपल्या दारी’ या शासकीय कार्यक्रमासाठी दि. २७ रोजी एक संदेश व्हायरल केला होता. त्या संदेशात स्वस्त धान्य दुकानाच्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमात उपस्थित राहणे. बंधनकारक आहे. जे रेशनधारक कार्यक्रमास हजर राहणार नाहीत त्यांना तीन ते चार महिने धान्य मिळणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यासंदर्भात नगरसेविका शिंदे यांनी दारकुंडेंविरोधात तक्रार केली होती. गैरप्रकार होत असल्याचा आरोपही केला होता. त्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेत दारकुंडे यांचा परवाना निलंबित केला. तसेच तहसीलदारांकरवी धान्य वितरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी दिले. दारकुंडे यांच्या स्वस्त धान्य दुकानातील कार्डधारकांसाठी अन्य दुकानातून धान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.





















