
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर तालुक्यातील मारवड शिवारात कपाशी पिकावर लाल्या रोग पडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पीकविमा, शासकीय मदत व नुकसान भरपाई तसेच जागेवर पंचनामा करण्यात यावा या मागणीचे निवेदन शेतकाऱ्यांतर्फे तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले.
कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील मारवड येथील ज्ञानेश्वर पवार यांची गोवर्धन शिवारात शेती आहे. त्यांनी त्यांच्या शेतात कापूस पिकाची लागवड केली आहे बदलत्या हवामानामुळे कापसाचे पीक लाल पडू लागले असून त्याची वाढ खुंटली आहे. या नैसर्गिक आपत्तीने शेतातील ७५% पिकाचे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तरी शासकीय यंत्रणेने प्रत्यक्ष शेतात येऊन पिकाची पाहणी करावी तसेच आपणास शासकीय मदत व पीकविमा नुकसानभरपाई मिळावी अशी विनंती शेतकऱ्यांतर्फे निवेदनात करण्यात आली आहे.





















