
जळगाव मिरर | २६ जुलै २०२३
राज्याच्या राजकारणातील सर्वच विरोधकांच्या मागे लागलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. या व्हिडिओची सखोल चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली होती.
त्यानुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. चौकशीच्या पहिल्याच टप्प्यात किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओवरून विधिमंडळात देखील मोठा गदारोळ झाला होता. प्रकरणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्याकडे एक पेन ड्राईव्ह असल्याचं सांगून खळबळ उडवून दिली होती. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर महिला शोषणाचा आरोपही केला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या मागणीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
या चौकशीच्या पहिल्याच टप्प्यात हा व्हिडिओ खरा असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेतील सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची जाहीर घोषणा झालेली नाही. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसले होते. अशात हा व्हिडिओ खरा असल्याची माहिती समोर येत आहे. हा व्हिडिओ जर खरंच खरा असेल तर किरीट सोमय्या यांच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते.






















