
जळगाव मिरर | २७ जुलै २०२३
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबत फेसबुकवरील तथा जळगाव ‘शिवसेना जळगाव ग्रामीण’ नावाच्या पेजवर बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांचे समर्थक तथा महानगर प्रमुख गणेश किसन सोनवणे (४० रा. जळगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, अज्ञात व्यक्तीने दि. ७ एप्रिल २०२३ पासून ते २५ जुलै २०२३ पर्यंत ‘शिवसेना जळगाव ग्रामीण’ या फेसबुकवर मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासंदर्भात त्रास देण्याच्या हेतूने तसेच त्यांची प्रतिमा मलिन होईल असे वक्तव्य असलेल्या पोस्ट टाकल्या आहेत. या फिर्यादीवरुन पोलिस बदनामी करणाऱ्या व्यक्तीविरोधात भादंवि कलम ४९९, ५०१ व ५०० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.





















