
जळगाव मिरर | १६ ऑगस्ट २०२३
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील डॉ, व्ही. आर. पाटील (८०) यांनी चोपडा तालुक्यातील निमगव्हाणजवळ असणाऱ्या तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली . आपली चारचाकी गाडी पुलावर लावून त्यांनी पुलावरून थेट नदीत उडी घेतली. यामुळे पाळधी गावासह धरणगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली. आज दुपारी अमळनेर तालुक्यात त्यांचा मृतदेह वाहून आला. काही भिल समाजाच्या तरुणांना तो दिसून आला. घटनेची माहिती कळताच अमळनेर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला.
सुसाईड नोटमध्ये काय लिहलंय
डॉ. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहली आहे. त्यात आपण स्वतंत्र दिनासारखा चांगला दिवस मृत्यूसाठी मुद्दामहून निवडत असल्याचे म्हटले आहे. जीवनात अनेक रुग्णांची सेवा आपल्या हातून झाली. त्यामुळे आता जीवन चांगल्या प्रकारे जगल्याचे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. पुरोगामी चळवळीत सक्रीय असलेल्या डॉ. पाटील यांना शासनाचा दलित मित्र पुरस्कार मिळाला .
रात्री उशिरा होणार अंत्यसंस्कार
डॉ. व्ही. आर पाटील यांचा मृतदेह अमळनेर तालुक्यात तापी नदीत आढळून आल्याने त्यांच्यावर रात्री पाळधी गावी ९ :३० वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.




















