भुसावळ : प्रतिनिधी
शाळासिद्धी राष्ट्रीय मूल्यांकनाच्या कार्यक्रमांतर्गत स्वयंमूल्यमापन करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले असून त्याकरिता जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण 100 टक्के शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात यावे. स्वयंमूल्यमापन करताना वास्तव परिस्थिती गृहित धरून हे काम वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी केले.
शाळासिद्धी 2021-22 साठीची स्वयंमूल्यमापन नोंदणी सुरू झाली असून ती पूर्ण करण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय नियोजन सभेत डॉ. झोपे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, स्वयंमूल्यमापनात शाळा व मुख्याध्यापकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी समुपदेशक म्हणून निर्धारक आणि साधनव्यक्तींनी काम करावे आणि जिल्ह्यातील सर्व शाळांचे स्वयंमूल्यमापन निर्धारित वेळेत पूर्ण करावे. त्यासाठी आवश्यक कोरोना कालावधीतील विद्यार्थी उपस्थिती व निकाल, स्वयंमूल्यमापनात नोंदवायच्या बाबी, गुणदान तक्ता व श्रेणी, निर्धारकाची भूमिका अशा विविध बाबींवर डॉ. झोपे यांनी सखोल मार्गदर्शन केले. तांत्रिक सहाय्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन श्यामकांत रूले यांनी तर आभार शाळासिद्धीचे जिल्हा नियंत्रण अधिकारी डॉ. डी.बी. साळुंखे यांनी मानले. नियोजन सभेला गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, जिल्हा निर्धारक, तालुका निर्धारक व साधनव्यक्ती यांची उपस्थिती होती.