जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२३
राज्यात गुन्हेगारी घटना व परिवारातील वादामुळे अनेक ठिकाणी धक्कादायक घटना घडत आहे. भंडाऱ्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात समोर आली आहे. घरातील शुल्लक भांडण झाल्याने पतीने रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात पाट घालून हत्या केल्याची घटना घडली. पत्नीच्या हत्येनंतर नवऱ्यानेही कालव्यात उडी घेतली. हि घटना लाखनी तालुक्यातील सिलोटी या गावात घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेत भारती चाचेरे आणि भारत चाचेरे अशी मयत पती-पत्नीची नावं असून याप्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात हत्या आणि आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
काय घडली घटना
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील सिलोटी गावात भारत चाचेरे हे आपल्या भारती या पत्नीसोबत दोन मुलांसह वास्तव्यास असून भारत चाचेरे मजुरी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. या दाम्पत्यामध्ये घरगुती कारणातून नेहमी वाद व्हायचे. बुधवारी नेहमीप्रमाणे पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला अन् पतीने लाकडी पाट पत्नीच्या डोक्यात घालून तिची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर पती फरार झाला. दरम्यान, हत्येची घटना उघड होताच लाखनी पोलिसांनी माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच लाखनी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर पोलिसांनी फरार पतीचा शोध सुरु केला. पतीचा शोध घेत असतानाच गावातील कालव्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. यानंतर पतीच्या आत्महत्येची बाब उघडकीस आली. एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी बारावीत शिकत आहे तर मुलगा दहावीत आहे. आई-वडिलांच्या भांडणात दोन मुलं अनाथ झाली आहेत. याप्रकरणी लाखनी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.