जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२३
देशभर आपल्या कामामुळे चर्चेत असलेले भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘गडकरी’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. चित्रपटाची घोषणा होताच सोशल मीडियावर चित्रपटाची बरीच चर्चा होती. चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हा सर्वांनाच गडकरींच्या भूमिकेत कोणता अभिनेता असेल? याची उत्सुकता होती. नुकताच चित्रपटाचा आगामी पोस्टर प्रदर्शित झाला असून नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा साकारणार असल्याची घोषणा करण्यात आली.
ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्यानंतर नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार याची घोषणा झाली. चित्रपटात गडकरींच्या भूमिकेत राहुल चोपडा दिसणार आहे. तर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत ऐश्वर्या डोरले दिसणार आहे.
या व्यतिरिक्त चित्रपटात नितीन गडकरी यांच्या मित्रांच्या भूमिकेत अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख दिसतील तर पत्रकाराच्या भूमिकेत तृप्ती प्रमिला केळकर दिसणार आहे. अनुराग राजन भुसारी दिग्दर्शित ‘गडकरी’ चित्रपट येत्या २७ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘गडकरी’ची कथा, पटकथाही अनुराग राजन भुसारी यांची असून अनुराग भुसारी, मिहिर फाटे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.