जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२३
नारळपाणी विक्रेत्याच्या जागेवर चारचाकी वाहन लावण्याच्या कारणावरुन डॉक्टर आणि नारळपाणी विक्रेत्यामध्ये वाद झाला. नारळपाणी विक्रेत्यासह त्याठिकाणी आलेल्या महिलेने डॉक्टरच्या गाडीची तोडफोड करीत त्यांना मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास पांडे चौकात घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रताप नगरात डॉ. निरज छगन चौधरी हे वास्तव्यास असून रविवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास ते पांडेचाकातील एका हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रीयेसाठी (एमएच १९ सीएफ ५६२८ ) क्रमांकाच्या कारने आले. त्याचे सहकारी अजय सेनानी व मंगेश दांगोडे हे त्यांच्या गाडीतील शस्त्रक्रीयेसाठी लागणारे साहित्य घेवून हॉस्पिटलमध्ये गेले. त्यानंतर डॉ. निरज चौधरी हे त्यांची गाडी रस्त्याच्याकडेला पार्क करुन हॉस्पिटलमध्ये जात असतांना एक इसम त्यांच्याजवळ आला. तो डॉ. चौधरी यांना म्हणाला की, तुम्ही ज्या जागेवर गाडी पार्क केली आहे, त्या जागेवर मी नारळाची गाड़ी लावतो. त्यामुळे तुम्ही गाडी काढून घ्या असे तो म्हणाला. त्यावर डॉ. चौधरी यांनी त्याला रस्त्यावर दुसरीकडे रस्त्यावर कार लावायला जागा नाही. ती जागा सार्वजनिक असून तुला काही तक्रार असेल तर तू पोलिसांना कळव असे म्हणत डॉ. चौधरी हे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रीया करण्यासाठी निघून गेले.
दहा ते पंधरा मिनिटांनंतर हॉस्पिटलमधील कामगार निलेश पावरा हा डॉ. निरज चौधरी यांच्याकडे येवून त्याने नारळाची हातगाडी लावणारा ईसम तुमच्या कारची तोडफोड करत आहे. तुम्ही खाली या असे म्हटल्यानंतर डॉ. चौधरी हे त्यांच्या गाडीजवळ आले. यावेळी नारळाची गाडीवाला आणि त्याच्यासोबत असलेला एक जण दोघे डॉक्टरांच्या अंगावर धावून आले. त्या दोघांना अजय सेनानी व मंगेश दांगोळे यांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी त्या दोघांना देखील मारहाण केली आणि हातातील कोयत्याने मंगेश दांगोडेच्या हाताला दुखापत केली. हा वाद सुरु असतांना एक महिला शिवीगाळ करीत त्याठिकाणी आली. तीने तु माझ्या आईला नारळाची गाडी का लावू देत नाही. महिलेने डॉ. चौधरी यांना मारहाण केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच दोन पोलिस कर्मचारी त्याठिकाणी आले. त्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत त्या दोघ तरुणांनी हुज्जत घालून ते तेथून पसार झाले. डॉ.चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अर्जुन राठोड, सोनू चव्हाण या दोघांसह महिलेवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहे.