जळगाव मिरर | २८ नोव्हेबर २०२३
जळगाव शहरातील शिव कॉलनी स्टॉप परिसरातील एका पेट्रोल पंप परिसरात इमारतीचे बांधकामाच्या ठिकाणी पाचव्या मजल्यावरून पडल्याने एक परप्रांतीय मजूर जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल राज्यातील दिनाजपूर येथील सुदाम दिलीप शर्मा (वय २६) हा तरुण जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरात कामाच्या निमित्ताने राहत होता. रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुदाम पेट्रोल पंप परिसरात इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत होता. रविवारी सायंकाळच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना त्याचा तोल जाऊन पाचव्या मजल्यावरून पडला.
त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.