जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२३
राज्यातील मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली. एका तरुणाने भुजबळ यांना धमकीचे सलग १२ मॅसेज पाठवले. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी धमकी देणाऱ्या तरुणाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौदागर सातनाक, असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे. मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ यांना सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हीच बाब लक्षात घेता, पोलिसांनी भुजबळ यांच्या निवास्थानाबाहेरील बंदोबस्त वाढवला आहे. इतकंच नाही, तर भुजबळ यांच्या ताफ्यातील सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी पुन्हा एकदा एका तरुणाने छगन भुजबळ यांना धमकी दिली.
फोनवर एकापाठोपाठ एक असे १२ मॅसेज पाठवत या व्यक्तीने भुजबळ यांना धमकी दिली. या धमकीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी देखील छावणी छावणी पोलिस ठाण्यात भुजबळ यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ सध्या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करीत आहेत. गुरुवारी छगन भुजबळ येवला दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांच्या दौऱ्याला येवला मतदारसंघातून प्रचंड विरोध करण्यात आला आहे. आम्ही नुकसान सोसू पण तुम्ही बांधावर येऊ नका, अशी भूमिका येवल्यातील गावकऱ्यांनी घेतली.