जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२३
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून घोषणाबाजी करत दगडफेक केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून ही दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली आढळून आली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी बँकेत एकत्र आले होते. या बैठकीस राजेश टोपेही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी इतर लोकप्रतिनिधींनी लावलेल्या वाहनाच्या ठिकाणीच आपली गाडी पार्क केली होती. बँकेच्या आवारात लावलेल्या टोपेंच्या या गाडीवरच अज्ञातांनी दगडफेक केली. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती.
या प्रकरणी आज बिनविरोध निवडणुकीची सुद्धा प्रक्रिया पार पडली. पण काही असंतुष्ट लोकांनी मुद्दाम गाडीवर दगडफेक केली. यामध्ये गाडीचा काच फुटला. असंतुष्ट लोकांनी हे कृत्य केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे. ज्या लोकांनी कायदा हातात घेतला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. जिल्ह्यातील सर्व निवडणूक बिनविरोध पार पडलेली असताना ज्यांनी अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन काम केले असेल त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले.