
जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२३
जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथे सुरु असलेल्या श्री. शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी महिलांच्या गळ्यातून मंगलपोत चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील २७ संशयित महिलांच्या टोळीच्या एलसीबीच्या पथकाने पर्दाफाश केला. या टोळीने मध्यप्रदेश, राजस्थानसह महाराष्ट्रातील मालेगाव व धुळेयाठिकाणी पार पडलेल्या शिवमहापुराण कथेमध्ये हात सफाई केली आहे. त्यांच्याविरुद्ध तब्बल २१ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी मंदिराजवळ श्री. शिवमहापुराण कथेला मंगळवारपासून सुरुवात झाली. कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविक दाखल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांच्या सोनपोत लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने संशयितरित्या फिरणाऱ्या तब्बल २७ महिलांना ताब्यात घेतले. यामध्ये अल्पवयीन मुलींचा देखील सहभाग होता. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर या महिला मध्यप्रदेशातील असून त्यांची टोळीच असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. याप्रकरणी २७ महिलांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीने पकडलेली टोळी ही मध्यप्रदेशातील धडेली हाडी पिंप्री, बरडीया, हिंगोलीया, धडेली चारभूजा, हाडी पिपल्या, बरखेडा या गावातील आहे. या टोळीतील सदस्य एकमेकांचे नातेवाईक असून १३ संशयित एका गावातील तर ८ संशयित महिला एका गावातील अन्य इतर गावातील आहे. या टोळीतील महिलांविरु चोरी, जबरी चोरी सारखे त्तब्बल २१ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. प्रसिद्ध कथाकार पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या श्री. शिवमहापुराण कथा आयोजीत केली जाते. त्याठिकाणी ही टोळी गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी लांबवित असल्याची उघड झाले आहे. या टोळीने मालेगाव, धुळे याठिकाणी पार पडलेल्या कथेमध्ये देखील त्यांनी हातसफाई केली आहे. याठिकाणाहून त्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लांबविला आहे. एलसीबीने पकडलेल्या टोळीकडून सुमारे ४ ते ५ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे.