जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२३
देशातील काही राज्यात भाजपने विधानसभा निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात देखील अनेक मतदार संघात भाजपचाच उमेदवार राहणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. २०२४ ला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. लोकसभेच्या निवडणुकीत भाजप विजयाची हॅट्ट्रिक करून मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार. महाराष्ट्रात महायुती लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकणार आहे, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
धाराशिव येथे भाजपच्या वतीने महाविजय २०२४ अंतर्गत सुपर वॉरियर संवाद मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी संबोधित केले. ते म्हणाले, राज्यात भाजपच्या वतीने ४८ लोकसभा मतदारसंघात महाविजय २०२४ अंतर्गत सुपर वॉरियर मेळावे घेत आहे. राज्यातील ३७ लोकसभा मतदारसंघात सुपर वॉरियर मेळावे झाले असून, डिसेंबर अखेरपर्यंत ४८ पूर्ण केले जाणार आहेत. राज्यात बुथ बांधणीअंतर्गत ३२ हजार ३३ सुपर वॉरियर टीम कार्यरत आहे. केंद्र व राज्य सरकार जनकल्याणकारी योजना राबवत आहे. त्यामुळे जनता भाजप महायुतीसोबत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अथक कष्ट, मेहनत व परिश्रम घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा केला. फडणवीस हे स्वतः वकील आहेत. त्यांनी स्वतः अभ्यास करून मराठा आरक्षणाचा कायदा बनवला. उच्च न्यायालयातही तो टिकला. मात्र उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात गांभीर्याने बाजू मांडली नाही. त्यामुळे आरक्षण रद्द झाले. मराठा आरक्षणाचे ठाकरे हेच मारेकरी आहेत