जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२३
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे करीत असून त्यांच्या सभेला मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ देखील सभा घेत आपली ताकद दाखवीत आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सभेत थेट राज्यात छगन भुजबळ यांच्यासारखा दुसरा कलंकित मंत्री असूच शकत नाही. मराठा समाजाला एकदा आरक्षण मिळू द्या, त्यानंतर मी त्यांचा कार्यक्रमच करतो, असा रोखठोक इशारा देखील त्यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ”इतक्या उच्च दर्जाचा मंत्री एक पुढारी सामान्य गोर गरीब मराठयांच्या लेकरांना मिळणाऱ्या आरक्षणात आडवा येतो. त्याच्यासारखा कलंकित मंत्री या राज्यात दुसरा असूच शकत नाही” अशा तिखट शब्दांत मनोज जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. तसेच ”एकदा आरक्षण मिळू द्या. त्यानंतर त्याचा कार्यक्रमच करतो” अशा शब्दांत भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. आरक्षणात आडवे जाणाऱ्यांचे टेन्शन तुम्ही घेऊ नका, त्याला मी एकटाच खंबीर आहे” असे म्हणत जरांगे यांनी समजाला विश्वास दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांची आज हिंगोलीत सभा पार पडणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस फाट्यावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसीची सभा झाली होती. त्यानंतर आज जरांगे यांची सभा होणार असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.