जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२३
दहा ते बारा दिवसांपासून घरातून निघून गेलेल्या राजू मानसिंग पाटील (वय ४०, रा. कोळवद, ता. यावल) यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास भादली ते जळगाव अप रेल्वेलाईवर घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील कोळवद येथील राजू पाटील हे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून घरातून निघून गेले होते. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, आज दुपारच्या सुमारास जळगाव ते भादली अप लाईनवरील खांबा क्रमांक ४२२/१८ ते १६ दरम्यान रेल्वेच्या धडकेत एक इसम ठार झाल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोहेकॉ विजय खैरे, राहूल घेटे, मुकुंद गंगावणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी राजू पाटील यांच्या नातेवाईक देखील त्याठिकाणी धाव घेत मयताची ओळख पटवली. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी रेल्वे उपस्टेशन प्रबंधक आर. के पालरेचा यांनी दिलेल्या खबरीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय खैरे हे करीत आहे.