जळगाव मिरर | १६ डिसेंबर २०२३
आगामी निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी संघटना बळकट करण्यासाठी मैदानात उतरले असतांना ठाकरे गटाने आज मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अदानी समूहाकडून या पुनर्विकासाचा कोणताही मास्टर प्लान देण्यात आलेला नाही. त्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महामोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर धारावीत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी झाले आहेत. यावेळी हजारो शिवसैनिकासह धारावीतील लाखो नागरिक देखील यात सहभागी झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले कि, धारावीच्या विकासाला आमचा आजिबात विरोध नाही, पण धारावीत राहणाऱ्या प्रत्येकाला 500 स्क्वेअर फुटांचं घर मिळावं, बाकी काही कारणं चालणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला. धारावीकरांना जिथल्या तिथे घर द्या, व्यवसायाला जागा द्या, धारावीतील कोळीवाडा आणि कुंभारवाड्याला वेगळी जागा द्या, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही ठाकरेंनी दिला आहे.
गेली अनेक वर्षे या प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. गरज पडली तर मुंबईच काय तर आख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेन. ज्यांनी धारावीची सुपारी घेतलीय त्यांनी समजून घ्यावं हा अडकित्ता आहे, त्यानं ठेचलं तर पुन्हा नाव घेणार नाही असा इशारा त्यांनी भाजपला दिला. जे व्यवसाय गुजरातला गेले ते धारावीत परत आणा, सुरतला नेलेले आर्थिक केंद्र धारावीत झालं पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. आता पन्नास खोके कमी पडायला लागलेत त्यामुळे आता धारावी विकायला निघालेत अशी टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हा लढा आता केवळ धारावीचा नाही तर महाराष्ट्राचा झाला आहे. अडीच वर्षे यशस्वीपणे चालणारे सरकार गद्दारी करून पाडलं, आता सर्वांना समजलं असेल की त्यांना खोके कुणी पुरवले असेल, त्यांची हॉटेल बुकिंग कुणी केलं असेल. जोपर्यंत मी होतो तोपर्यंत यांना काहीच करता आलं नाही. त्यामुळे सरकार पाडलं.