जळगाव मिरर | २२ डिसेंबर २०२३
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांचा जोरदार सभा सुरु असून दुसरीकडे ओबीसी तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आणखी एकदा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला आहे.
मंत्री भुजबळ म्हणाले कि, आता तर देवही मनोज जरांगे यांना घाबरतो. जरांगे सरकारला वेठीस धरत नाहीतर, सरकारच जरांगेंना वेठीस धरत आहे, सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि काही मंत्र्यांना जरांगेंच्या आंदोलनस्थळी कायमस्वरुपी बंगले द्यावेत, असा उपरोधिक टोला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना लगावला आहे.
पुढे भुजबळ म्हणाले, ” आपण जरांगेंचं ऐकायला पाहिजे. मंत्र्यांचे दोन-चार बंगले तिथे बांधले पाहिजेत. त्यांना रोज अभिनव कल्पना येतात, त्यांचा आदर राखला पाहिजे. नाहीतर मोर्चा घेऊन ते येतील. व्याह्याचे व्याही व्याह्याचे व्याही असं सर्वांना आरक्षण दिलं पाहिजे. ते पुढे जाऊन शिक्षणाबाबत शेतकऱ्यांच्याबाबत सुद्धा केले पाहिजे. माझे तर म्हणणं आहे की, सरकारने वाटाघाटीचा घोळ घालू नये” असेही भुजबळ यांनी म्हंटले आहे. यावेळी भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर उपरोधिक टोलेबाजी केली आहे. “मी एकदम युटर्न घेतला आहे. सध्या जी अपात्रतेची सुनावणी सूरू आहे, त्याबाबतही जरांगे यांच्याशी बोलावे आणि पटकन निर्णय घेतला जावा. उपरोधिक म्हणा, हतबलता म्हणाव काय म्हणायचे आहे ते म्हणा”, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.