जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२४
राज्यातील स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात मोठी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे एकाकी पडले आहे. राज्यातील भाजप व शिंदे गटातला ठाकरे गटाचे नेते जश्यास तसे उत्तर देत असतांना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. या पत्रात भारताच्या लोकशाही मूल्यांचं खच्चीकरण केलं जात असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. लोकशाही संपवून हुकूमशाही जिथे निर्माण झाली तिथे लोकांचं काहीही भलं झालेलं नाही असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
आ.आदित्य ठाकरे यांच्या पत्रात काय आहे नमूद
हे आपलं वर्ष आहे! आपण हे वर्ष फक्त आपल्यासाठी नाही, तर आपल्या देशासाठी समर्पित करायला हवं. भारताच्या लोकशाही मूल्यांचं आणि संविधानाचं कायेदशीर बाबींचाच वापर करुन खच्चीकरण केलं जाताना दिसत आहे. जगभरात जिथे लोकशाही संपवण्यात आली, तिथे ती संपवण्यासाठी अशाच संस्थांचा वापर केला गेला होता. ज्या खरंतर लोकशाहीच्या रक्षणासाठी अस्तित्त्वात आल्या होत्या. लोकशाही संपवून हुकूमशाही निर्माण झालेल्या ठिकाणी आजपर्यंत सामान्य लोकांच्या भल्यासाठी काहीही झालेले नाही. जे काही केले गेले ते केवळ मोजक्या लोकांसाठी, तुमच्या-माझ्यासारख्या १.३ अब्ज लोकांसाठी तर नक्कीच नाही.
आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर, पुन्हा लोकशाही अस्तित्वात आणणं हेच आपलं ध्येय आहे. २०२२ च्या मध्यात गद्दारांच्या टोळीने शांतीप्रिय आणि प्रगतीशील महाराष्ट्राचं रुपांतर बिल्डर्स आणि कंत्राटदार मिळून चालवत असलेल्या एका बेकायदेशीर राजवटीत केलं. आता खोके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे आपली शहरं उद्ध्वस्त होत आहेत. रस्ते, विकास योजनांमध्ये घोटाळे होते आहेत. उद्यानं गिळंकृत केली जात आहेत. इतकंच नाही तर रस्त्यावरील फर्निचर, सॅनिटरी पॅड्स यांच्याबाबतीतही घोटाळे होत आहेत. हे फक्त भ्रष्ट कारभाराचं वरवरचं टोक आहे.