जळगाव मिरर | १९ जानेवारी २०२४
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून थंडीचा तडाखा पडत असल्याने अनेक ठिकाणी पहाटे व रात्रीच्या सुमारास शेकोटी करून अनेक लोक थंडीपासून बचाव करीत असतांना याच शेकोटीजवळ बसलेल्या एका ७१ वर्षीय वृद्ध महिलेची साडी पेटल्याने दुर्देवाने मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून नजीक असलेल्या निमखेडी येथे बायजाचाई चामन सोनवणे (वय ७१) हे आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि. १७ जानेवारी बुधवार रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास थंडी वाजत असल्याने त्या घराच्या पुढच्या हॉलमध्ये शेकोटी करून बसलेल्या होत्या, त्यावेळी अचानक त्यांच्या साडीच्या पदरला आग लागल्याने त्यात त्या गंभीरित्या भाजल्या गेल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवार दि. १८ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात जगदीश आणि अशोक हे दोन मुले, विवाहित मुलगी, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लीलाधर महाजन हे करीत आहे.