जळगाव मिरर | ३ मार्च २०२४
सध्या देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून याच पार्श्वभूमीवर राज्यात देखील महायुतीमध्ये जागावाटपावरून चर्चा जोरदार सुरु झाली आहे. या जागावाटपावरून महायुतीत अद्यापही मनोमीलन झाल्याचे दिसत नाहीये. सर्वच नेते जाहिरपणे आपल्या उमेदवारीचा दावा करत आहेत. अशात सध्या नवणीत राणा भाजपमध्ये जाणार, अशा चर्चा सुरू आहेत. त्यावर खासदार नवनीत राणा यांनी स्वत: प्रतिक्रिया देत सूचक वक्तव्य केलं आहे.
भाजपमध्ये जाण्याबाबत माझी आणि रवी राणांची चर्चा नेहमी सुरू असते. आम्ही बोललो तरी चर्चेत असतो आणि नाही बोललो तरी चर्चेत असतो. आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो, अशा शब्दांत नवणीत राणा यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीमध्ये अमरावती मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गट आनंदराव अडसूळ आणि खासदार नवनीत राणा इच्छूक आहेत. अशात राजकारण सोडावे लागले तरी चालेल, मात्र मी नवनीत राणा यांच्या प्रचाराला जाणार नाही, असं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलंय. त्यावर देखील नवनीत राणांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आम्ही एनडीएसोबत आहोत त्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं नाही. उद्या नमो युवा संमेलन आहे, एनडीएचे घटक म्हणून मी उद्या त्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. कोण काय बोलतं यावर मी बोलत नाही. राजकारणातील कोणती व्यक्ती राजकारण सोडेल हा विषय माझा नाही, असं नवनीत राणा यांनी म्हटलं.
यावेळी रवी राणा यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला. “यानंतर अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ यांनाही श्रीरामाच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ. आनंदराव अडसूळ आम्हाला आशीर्वाद देतील. राजकारण सोडू असे अनेक लोक बोलत आलेत. राजकारण असं आहे जिवंत असेपर्यंत कणाकणामध्ये आणि रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे. जोपर्यंत आनंदरावर अडसूळ हयातीत आहे तोपर्यंत ते राजकारण सोडणार नाही आणि नवनीत राणांचा नक्की प्रचार करतील, अशा शब्दांत रवी राणा यांनी देखील आनंदराव अडसूळ यांना प्रत्युत्तर दिलं आहे.