जळगाव मिरर | ९ मार्च २०२४
महाशिवरात्रीचा उत्साह देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना एक धक्कादायक घटना नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथे महाशिवरात्रीनिमित्त भगरीच्या फराळातून ७५ जणांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. तर दुसरीकडे शिंदखेडा तालुक्यातदेखील अमळथे येथे विषबाधेची घटना समोर आली आहे. या ठिकाणी अंत्यविधी आटोपून घरी आलेल्या नातलगांनी भगर खाल्ल्याने ५२ जणांना विषबाधा झाली. दरम्यान, दोन्हीही घटनांमधील रुग्णांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु आहेत.
पहिल्या घटनेत, घोटाणे, ता नंदुरबार येथे गावातील रहिवाशांनी फराळासाठी एका बॅण्डची भगर खरेदी केली होती. भगर खाल्ल्यानंतर सायंकाळी अनेकांना त्रास जाणवू लागला. यामुळे रनाळे येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांनी तत्काळ धाव घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक नरेश पाडवी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. रात्री ९ वाजेपर्यंत सुमारे ७५ जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, यातील ४० जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते.



















