जळगाव मिरर | १८ मार्च २०२४
कर्जाला कंटाळून दापोरा येथील ज्ञानेश्र्वर त्र्यंबक वाणी (वय ३५) या तरुण शेतकऱ्याने दापोरा ते शिरसोली दरम्यान असणाऱ्या रेल्वे रुळावर पूल परिसरात रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवार दि. १५ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील दापोरा येथे ज्ञानेश्वर त्र्यंबक वाणी हा आई-वडील, पत्नी, दोन मुले यांच्यासह राहत होता. त्याला तीन विवाहित बहिणी आहेत. शेतीकाम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान शुक्रवारी दि. १५ मार्च रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून गेल्या अनेक दिवसांपासून ते नैराश्यात होते. त्याच्याचमुळे रात्री ८ वाजेच्या सुमारास दापोरा ते शिरसोली दरम्यान रेल्वे रुळावर पुलावर खंबा क्रमांक ४०७/१ ते ४०७/३ दरम्यान ज्ञानेश्वर वाणी यांनी रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान आजूबाजूच्या ग्रामस्थांना घटना समजली तेव्हा त्यांनी दापोरा गावचे पोलीस पाटील जितेश गवांदे यांना माहिती दिली. पोलीस पाटील गवांदे यांनी तालुका पोलीस स्टेशनला खबर देऊन सदर मृतदेह हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केले.