जळगाव मिरर | २७ मार्च २०२४
देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना भाजपने गेल्या काही दिवसापूर्वीचा उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज ठाकरे गटाने पहिली यादी जाहीर केली असतांना आता पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे, असं या समन्समध्ये नमूद करण्यात आलंय.
लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसं ईडीच्या कारवायाचं सत्र देखील वाढलं आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील ईडीने अटक केली होती. यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना देखील ईडीने समन्स बजावलंय. त्यामुळे विरोधक आक्रमक होऊन सत्ताधारी भाजपला धारेवर धरण्याची शक्यता आहे. अमोल कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांची या भागात मोठी ताकद आहे. अशातच त्यांना ईडीचे समन्स आल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.