जळगाव मिरर | २८ मार्च २०२४
देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना युती आघाडीमध्ये बैठकांचे सत्र सुरु असतांना नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, संजय राऊत यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्हाला आघाडीच्या भ्रमात ठेवून लोकसभा निवडणुकीत जागा पाडण्याचे कारस्थान रचले, असा गंभीर आरोप गुरुवारी त्यांनी केला आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती, तुम्ही आमच्या विरोधात अकोल्यातून उमेदवार उभा करण्याचा मनोदय व्यक्त केला होता की नाही, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट करून केलाय. संजय राऊत यांनी संविधान रक्षणाची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांची असल्याचे सकाळी म्हटले होते. त्यालाच आंबेडकरांनी चोख प्रत्युत्तर दिलेय.
महाविकास आघाडीतील जागावाटपावरून सध्या मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. “संजय राऊत किती खोटं बोलणार? तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही? फोर सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही? वंचितला आमंत्रण न देता आजही बैठक का घेत आहात?”, असे अनेक सवाल आंबेडकर यांनी उपेक्षित केले आहेत.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी पाठीत सुरा खुपसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो देखील पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सुरा खुपसलेल्या व्यक्तीवर वंचित तर हल्ला करणाऱ्या हातावर संजय राऊत असे लिहीलेले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या पोस्टची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.