जळगाव मिरर | १ एप्रिल २०२४
चोपडा तालुक्यातील आदिवासी भागात गेरुघाटी ते वैजापूर रस्त्यावरील वन विभागाच्या नाक्या जवळ पुन्हा एकदा गावठी कट्टा सापडल्याची घटना घडली असून आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस व मोटारसायकल मिळून एकूण ७६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेहमल जेमल पावरा (वय ३३) रा. जिरायत पाडा, ता.चोपडा हा शनिवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास वैजापूर रोड फॉरेस्ट नाक्या जवळ (चेकपोस्ट) आला. सार्वजनिक जागी त्याच्याकडे २५ हजार किमतीचा एक गावठी बनावट कट्टा व एक हजार रुपये किंमतीचे पिवळ्या धातूचे एक जिवंत काडतूस (राउंड) उजवे खिशात मिळून आले. गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस हे प्राणघातक अग्नि शस्त्र असल्याचे माहीत असतानाही विनापरवाना आपले कब्जात स्वत:च्या फायद्यासाठी जवळ बाळगून मोटारसायकलसह मिळून आला म्हणून रेहमल जेमल पावरा याच्याविरुद्ध पोलिस कॉन्स्टेबल चेतन महाजन यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल शशिकांत पारधी करत आहे.
गावठी कट्टा व आरोपीसह पोलिस. एसपींच्या भेटीनंतरही गावठी कट्टा सापडला जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी व बडवाणीचे पोलिस अधीक्षक पुनीत गेहलोत यांनी दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेश राज्यात गावठी कट्टे ज्या गावात बनतात त्या पार उमर्टी गावात प्रत्यक्ष गावकऱ्यांशी संवाद साधला होता. आपण हे चुकीचे व बेकायदेशीर काम थांबवा. गावठी कट्टे बनवू नका.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांनी आंतरराज्यीय बैठक घेऊनही पुन्हा गावठी कट्टे सापडतच आहेत. आरोपीस १५ दिवसांची कोठडी चोपडा न्यायालयाला सुटी असल्यामुळे आरोपीस अमळनेर येथे घेऊन गेले होते. अमळनेर न्यायालयाने आरोपीला पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आरोपींना जिल्हा कारागृहात रवानगी होणार अशी माहिती पीआय कमलाकर यांनी दिली.