जळगाव मिरर | ३ मे २०२४
राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगत असतांना निवडणुकीच्या मैदानात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झालाय. अकोल्यामध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झालाय. अकोला जिल्ह्यातल्या पातुर शहराजवळ हा अपघात झालाय. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीचे शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पातुर शहरातील पुलाजवळ दुपारी ही घटना घडली आहे. दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. कारमधून किरण सरनाईक यांचा भाई , भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे.
या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातामध्ये काही जण जखमी झाले आहेत. जखमींना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते तपास करत आहेत.